नवी दिल्ली : सर्बियाच्या राजकारणात प्रदीर्घ काळ दबदबा राखणारे नेते अलेक्झांडर वुसिक यांनी आपला पराभव मान्य केला आहे. रविवारी जाहीर झालेल्या निकालांनी गेल्या दोन वर्षांपासून देशात धुमसत असलेल्या राजकीय संघर्षाला पूर्णविराम दिला. या ऐतिहासिक निवडणुकीत वुसिक आणि त्यांच्या उजव्या विचारसरणीच्या पक्षाला विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आक्रमक जनचळवळीने थेट आव्हान देत सत्तेवरून खाली खेचले.
बाल्कन प्रदेशाच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय सत्तापालट मानला जात आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा पाठिंबा असलेल्या अलेक्झांडर वुसिक यांनी तब्बल १४ वर्षे सर्बियावर राज्य केले. आपल्या विरोधात उभ्या ठाकलेल्या विद्यार्थी चळवळीला त्यांनी सत्तेवरून हटवण्याचा परकीय कट असा रंग देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राजकीय तणावाच्या छायेत पार पडलेल्या या निवडणुकीत मतदारांनी वुसिक यांना नाकारले. सत्ताधारी उजव्या विचारसरणीच्या सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि विद्यापीठातील तरुण विद्यार्थी यांच्यात झालेल्या या थेट लढतीत, भ्रष्टाचार आणि लोकशाहीच्या गळचेपीविरोधात उठलेल्या विद्यार्थी शक्तीला जनतेने निर्विवाद कौल दिला.
सर्बियाचे ६४ लाख मतदार २५०-सदस्यीय संसदेसाठी आपल्या प्रतिनिधींची निवड करत होते. पराभव मान्य करताना, वुसिक म्हणाले की, त्यांच्या पक्षाच्या अंदाजानुसार तरुणांचा पाठिंबा असलेल्या स्टुडंट्स लिस्टला १३५ ते १४० जागा मिळतील, तर त्यांच्या पक्षाला सुमारे १०५ जागा मिळू शकतील. त्यामुळे त्यांनी पराभव मान्य केला.
वुसिक यांनी अमेरिकेच्या डीप स्टेटला जबाबदार धरले
आपल्या पक्षाच्या निवडणूक रॅलीत समर्थकांना संबोधित करताना वुसिक म्हणाले, ङ्गङ्घविद्यार्थी लिस्ट जिंकली आहे.ङ्घङ्घ त्यांनी आपल्या पक्षाच्या पराभवासाठी सर्बियाची स्वतंत्र माध्यमे, काही युरोपीय देशांचा कथित हस्तक्षेप आणि अमेरिकेच्या डीप स्टेटला जबाबदार धरले. सर्बियामधील आंदोलने भ्रष्टाचार आणि वाढत्या हुकूमशाहीविरोधात सुरू झाली. २०२४ मध्ये नोवी साद येथील रेल्वे स्थानकाचे छत कोसळून १६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर या आंदोलनांना सुरुवात झाली.